मुंबईत दिवंगत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली; देशातील दिग्गजांची उपस्थिती

मुंबईत दिवंगत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली; देशातील दिग्गजांची उपस्थिती
मुंबईत दिवंगत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली; देशातील दिग्गजांची उपस्थिती

मुंबई, वरळी दि २३ :- एनएससीआय डोम, वरळी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजली सभेचे भावपूर्ण आयोजन करण्यात आले. राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेला राजकीय, औद्योगिक, न्यायिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.

या वेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी सरन्यायाधीश भूषण गवई, विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगपती गौतम अदानी, मुकेश अंबानी, तसेच अभिनेते नाना पाटेकर आणि जॅकी श्रॉफ यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य, आमदार व विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.

“त्यांचे कार्य पिढ्यान् पिढ्या प्रेरणा देईल” – राज्यपाल

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या सार्वजनिक जीवनाचा उल्लेख करताना सांगितले की, युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य राज्याच्या प्रत्येक क्षेत्रात आजही जाणवते. त्यांचा सहज, सरळ आणि सर्वांना आपलेसे करणारा स्वभाव पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

“महाराष्ट्राचे खरे ‘रिअल स्टार’” – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, महाराष्ट्राच्या उभारणीत अजित पवार यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कार्याचा ठसा राज्य कधीही विसरणार नाही. “दिवंगत अजित पवार हेच महाराष्ट्राचे खरे ‘रिअल स्टार’ होते,” अशा शब्दांत त्यांनी स्मृतींना उजाळा दिला.

विकासासाठी कटिबद्ध नेतृत्व

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अजितदादांनी विकासकामांच्या दर्जात कधीही तडजोड केली नाही. मंत्रिमंडळ बैठकीत काटेकोर आर्थिक धोरणांचा पाठपुरावा करतानाच, प्रकल्पांसाठी अभ्यासपूर्ण माहिती सादर करून निधीची प्रभावी तरतूद केली. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी आर्थिक संतुलन साधत घेतलेला निर्णय त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पांना गती – गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आठवण सांगताना म्हटले की, पुण्यासाठी उन्नत पुलासारख्या प्रकल्पांसाठी अजित पवार सातत्याने पाठपुरावा करत होते. केवळ मंजुरीपुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्ष स्थळ भेट देऊन प्रगतीचा आढावा घेत प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची त्यांची कार्यशैली होती.

दिवंगत अजित पवार यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची उजळणी करताना उपस्थित मान्यवरांच्या डोळ्यांत पाणी तरळले; महाराष्ट्राने एका विकासदृष्ट्या परखड आणि कर्तृत्ववान नेत्याला गमावल्याची भावना सभागृहात दाटून आली.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अजितदादांचे नाव विकासाच्या अध्यायात सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल, हेच या सभेचे सामूहिक प्रतिध्वनी ठरले.