‘पप्पू ते जननायक’; रामलीला मैदानावर राहुल गांधींचा एल्गार! १२ वर्षांच्या संघर्षानंतर बदलत्या राजकीय वाऱ्यांचे संकेत?

‘पप्पू ते जननायक’; रामलीला मैदानावर राहुल गांधींचा एल्गार! १२ वर्षांच्या संघर्षानंतर बदलत्या राजकीय वाऱ्यांचे संकेत?
‘पप्पू ते जननायक’; रामलीला मैदानावर राहुल गांधींचा एल्गार! १२ वर्षांच्या संघर्षानंतर बदलत्या राजकीय वाऱ्यांचे संकेत?

नवी दिल्ली दि १ :- दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर आज राहुल गांधी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत राजकीय वातावरण ढवळून काढले. एकेकाळी लोकनायक जयप्रकाश नारायण आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ऐतिहासिक सभांचे साक्षीदार ठरलेल्या याच मैदानावर आज राहुल गांधी यांच्या सभेने राजकीय चर्चांना नवे वळण दिले.

गेल्या बारा वर्षांतील राहुल गांधी यांचा राजकीय प्रवास संघर्ष, टीका आणि आव्हानांनी भरलेला राहिला आहे. विरोधकांकडून सातत्याने होणारी टीका, 'पप्पू' अशी हेटाळणी आणि राजकीयदृष्ट्या संपवण्याचे प्रयत्न, अशा अनेक आव्हानांना सामोरे जात त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवली.

खासदारकी रद्द होणे, सरकारी निवासस्थान रिकामे करण्याची वेळ येणे, विविध न्यायालयीन खटल्यांना सामोरे जाणे आणि सोशल मीडियावरून होणारी टीका, अशा घटनांमुळे राहुल गांधी यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल, असा दावा त्यांच्या विरोधकांकडून केला जात होता. मात्र, या सर्व परिस्थितीतही त्यांनी राजकीय संघर्ष सुरूच ठेवला.

त्यांच्या कुटुंबीयांवर झालेली वैयक्तिक टीका, आई सोनिया गांधी यांच्याबद्दल वापरले गेलेले आक्षेपार्ह शब्द आणि सोशल मीडियावरील बदनामीच्या मोहिमा यांचाही त्यांच्या राजकीय प्रतिमेवर परिणाम करण्याचा प्रयत्न झाल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.

मात्र, राहुल गांधी यांनी माघार न घेता देशभरात दौरे, जनसंवाद आणि विविध मुद्द्यांवर सरकारला जाब विचारण्याची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे एकेकाळी 'पप्पू' म्हणून हिणवले जाणारे राहुल गांधी आज 'जननायक' म्हणून समर्थकांकडून गौरवले जात आहेत.

रामलीला मैदानावरील आजच्या सभेने त्यांच्या समर्थकांमध्ये नवा उत्साह निर्माण केला असून, देशातील राजकीय वातावरण बदलत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या सभेतून झाला. आगामी काळात या शक्तिप्रदर्शनाचे निवडणुकीच्या राजकारणावर कितपत परिणाम होतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

'अब मौसम बदल रहा है!' असा विश्वास व्यक्त करत राहुल गांधी यांच्या समर्थकांनी आजच्या सभेकडे केवळ एका राजकीय कार्यक्रमापेक्षा संघर्षातून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाच्या शक्तिप्रदर्शनाच्या रूपात पाहिले.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित