दिवाळीच्या तोंडावर FDA ची धडक कारवाई! छत्रपती संभाजीनगरमध्ये चार आस्थापना सील
दोन तेल पॅकिंग युनिट, मिठाई आणि फराळ उत्पादकांचा समावेश; निलंबन आदेशाचे उल्लंघन करून सुरू होता व्यवसाय
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ७ :- दिवाळीच्या सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) 'Safe Food Safe Maharashtra' मोहिमेअंतर्गत शहरात मोठी कारवाई केली आहे. निलंबनाचे आदेश असतानाही व्यवसाय सुरू ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर दोन तेल पॅकिंग युनिट आणि दोन मिठाई व फराळ उत्पादक अशा एकूण चार आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.
अन्न प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये पुढील व्यावसायिकांचा समावेश आहे.
1. मेसर्स गुरू गणेश ऑईल रिपॅकिंग युनिट, लासूर.
2. मेसर्स रवी ऑईल रिपॅकिंग युनिट, लासूर.
3. मेसर्स मधुर मिलन मिठाई उत्पादक, स्टेशन रोड MIDC.
4. साई भंडार फराळ उत्पादक, छत्रपती संभाजीनगर.
विशेष म्हणजे, संबंधित चारही आस्थापनांचे परवाने यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते. मात्र, निलंबनाच्या कालावधीतही व्यवसाय सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरासे आणि प्रशांत कुचेकर यांनी संबंधित आस्थापनांवर पाळत ठेवून कारवाई केली आणि चारही ठिकाणे सील केली.
नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा
या चारही आस्थापनांविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे निलंबनाच्या कालावधीत व्यवसाय सुरू ठेवल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासह अन्न व्यवसाय परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने अन्न व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा तपासणी मोहिमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.