मातृभूमीच्या गावात प्रेमाचा वर्षाव! डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा बोरगावकरांकडून जंगी सत्कार; भावनिक होत आमदार म्हणाले, “आपल्या माणसांचे प्रेम अनमोल!”
कळंब दि १० :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार म्हणून निवडून आलेले डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा त्यांच्या मातृभूमी असलेल्या बोरगाव (धनेश्वरी), ता. कळंब येथे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात आणि जिव्हाळ्याच्या वातावरणात सत्कार करण्यात आला. गावकऱ्यांनी केलेला हा सन्मान डॉ. पाटील यांच्यासाठी अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय ठरला. आपल्या गावातील माणसांनी व्यक्त केलेले प्रेम, आपुलकी आणि विश्वास पाहून ते भावुक झाले.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बोरगावच्या ग्रामस्थांनी डॉ. पाटील यांच्या विजयासाठी पक्षभेद बाजूला ठेवून आपापल्या परीने योगदान दिले होते. कुणी मोबाईलवर संदेश पाठवून, कुणी फोनद्वारे संपर्क साधून, तर कुणी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. गावकऱ्यांनी दिलेल्या या खंबीर साथीबद्दल डॉ. पाटील यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी बोलताना त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन आपली ऊर्जा, ज्ञान आणि कर्तृत्व गावाच्या प्रगतीसाठी उपयोगात आणावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
“गावकऱ्यांनी दिलेले प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. या प्रेमामुळे आपल्या गावासाठी काम करण्याची प्रेरणा आणि जबाबदारी अधिक वाढली आहे,” अशी भावना डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.
निवडणुकीतील विजयापेक्षाही आपल्या मातृभूमीतील माणसांनी केलेला हा प्रेमाचा सन्मान मनाला अधिक भावला, अशा भावना व्यक्त करत त्यांनी समस्त बोरगाव (धनेश्वरी) ग्रामस्थांचे ऋण व्यक्त केले.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित