भटक्या-विमुक्त समाजातील मुलांनी शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात यावे – मंत्री संजय राठोड

कांचनवाडीतील वस्त्यांना भेट देत समाजबांधवांच्या समस्या जाणून घेतल्या; महिलांना शिधावाटप

भटक्या-विमुक्त समाजातील मुलांनी शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात यावे – मंत्री संजय राठोड
भटक्या-विमुक्त समाजातील मुलांनी शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात यावे – मंत्री संजय राठोड

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १६ :- भटक्या-विमुक्त जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. या समाजातील मुला-मुलींनी शिक्षणाच्या संधींचा लाभ घेऊन प्रगती साधावी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.

मंत्री संजय राठोड यांनी सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) छत्रपती संभाजीनगर येथील कांचनवाडी परिसरातील भटक्या-विमुक्त समाजाच्या वस्त्यांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समाजबांधवांच्या विविध समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या.

या भेटीदरम्यान जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, जन्मदाखले, निवास, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आवश्यक शासकीय कागदपत्रे, शिक्षणाच्या सुविधा आणि रोजगाराच्या संधी पोहोचणे गरजेचे असल्याचे मंत्री राठोड यांनी स्पष्ट केले.

भटक्या-विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शासन प्रयत्नशील असून, या समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाऊबीजेच्या निमित्ताने मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते समाजातील महिलांना शिधावाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी कलोसे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राजपाल राठोड, महादेव चव्हाण, जगन बाबर, परमेश्वर जाधव यांच्यासह भटक्या-विमुक्त जमातींच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.