नो नेटवर्क भागाला अखेर मिळणार नळाचे पाणी; मात्र कनेक्शनसाठी ८ हजारांचा भुर्दंड!

नो नेटवर्क भागाला अखेर मिळणार नळाचे पाणी; मात्र कनेक्शनसाठी ८ हजारांचा भुर्दंड!
नो नेटवर्क भागाला अखेर मिळणार नळाचे पाणी; मात्र कनेक्शनसाठी ८ हजारांचा भुर्दंड!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १६ :- शहरातील नो नेटवर्क भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने नळजोडणी देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, या नळ कनेक्शनसाठी नागरिकांना तब्बल ८ हजार रुपये मोजावे लागणार असल्याने नागरिकांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

महापालिकेच्या नियोजनानुसार, एका नळ कनेक्शनसाठी ६ हजार रुपये जोडणी शुल्क आणि चालू वर्षाची २ हजार रुपये पाणीपट्टी असे एकूण ८ हजार रुपये आकारले जाणार आहेत. यासाठी आवश्यक साहित्य खरेदीची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली असून, लवकरच यासंदर्भात निविदा काढण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात नो नेटवर्क भागातील तब्बल ४५ ते ५० हजार नागरिकांना नळजोडणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पाण्यासाठी टँकरवर अवलंबून असलेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मात्र, नळजोडणी मिळवण्यासाठी केवळ ८ हजार रुपये भरून चालणार नाही. संबंधित मालमत्तेची मालमत्ता कर आकारणी करून चालू वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर भरणेही बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे नळ कनेक्शनच्या शुल्कासोबतच मालमत्ता कराचाही अतिरिक्त आर्थिक भार नागरिकांवर पडणार आहे.

आधीच टँकरच्या महागड्या दराने पाणी विकत घेऊन तहान भागवणाऱ्या नागरिकांना आता नळजोडणीसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या या निर्णयामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली असली, तरी आर्थिक अटींमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाणी मिळणार, पण त्यासाठी नागरिकांना किती आर्थिक भार सहन करावा लागणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित