महापालिकेची धडक कर वसुली मोहीम; एका दिवसात १७ मालमत्ता सील, तब्बल ९२.७० लाखांचा कर वसुल
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २० :- महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (२० जून) महानगरपालिकेच्या सर्व १० झोनमध्ये विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मोठ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई करत एका दिवसात तब्बल १७ मालमत्ता सील करण्यात आल्या, तर ९२.७० लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला.
आयुक्तांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपआयुक्त विकास नवाळे यांनी प्रत्येक झोनसाठी १५ ते २० मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार झोननिहाय कर वसुली पथकांनी दिवसभर विशेष मोहीम राबवली.
झोननिहाय कारवाईत झोन १ मध्ये एक मालमत्ता सील करत १३.६० लाखांची वसुली करण्यात आली. झोन २ मध्ये एक मालमत्ता सील करून १ लाख रुपये जमा झाले. झोन ३ मध्ये दोन मालमत्ता थकबाकीमुळे सील करण्यात आल्या. झोन ४ मध्ये तीन मालमत्ता सील करून ४.६० लाखांचा कर वसूल झाला.
झोन ५ मध्ये सर्वाधिक कारवाई करत सहा मालमत्ता सील करण्यात आल्या आणि १९.०९ लाखांची वसुली झाली. झोन ६ मध्ये तीन मालमत्ता सील करत १३.६५ लाख, झोन ७ मध्ये तीन मालमत्ता सील करत ३.७५ लाख, तर झोन ८ मध्ये एक मालमत्ता सील करून सर्वाधिक ३६.७५ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला. झोन १० मध्ये तीन मालमत्ता सील करून ३ लाखांची वसुली करण्यात आली.
या विशेष मोहिमेदरम्यान महापालिकेने एकूण ७३ मालमत्तांना भेटी दिल्या. थकबाकीदारांवर कठोर भूमिका घेत प्रशासनाने आगामी काळातही अशी मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
थकबाकीदारांवर महापालिकेचा दणका सुरूच; पुढील कारवाईकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.