महानगरपालिकेची धडक मोहीम; १५ मालमत्ता सील, एका दिवसात १.०९ कोटींची कर वसुली
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि२५ :- महानगरपालिकेच्या कर वसुली मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादानंतर प्रशासनाने सलग दुसऱ्या आठवड्यात मोठी कारवाई करत गुरुवारी शहरातील विविध झोनमध्ये धडक मोहीम राबवली. या मोहिमेत एका दिवसात तब्बल १५ थकबाकीदार मालमत्ता सील करण्यात आल्या, तर १ कोटी ९ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला.
महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपआयुक्त विकास नवाळे यांनी सर्व १० झोनमधील मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करून संबंधित पथकांना कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रत्येक झोनमध्ये कर वसुली पथकांनी दिवसभर धडक कारवाई केली.
झोननिहाय कारवाईमध्ये झोन ४ मध्ये सर्वाधिक ५ मालमत्ता सील करण्यात आल्या, तर झोन ९ मध्ये सर्वाधिक २८.८० लाख रुपयांची कर वसुली झाली. झोन २, ७, ९ आणि १० मध्येही सीलची कारवाई करण्यात आली.
या मोहिमेमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून आगामी काळातही अशी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
वाचा, जाणून घ्या आणि आपल्या शहरातील प्रत्येक मोठ्या घडामोडींसाठी जोडलेले रहा – महाराष्ट्र वाणीसोबत!