फळविक्रेत्याचा मुलगा बनला चार्टर्ड अकाउंटंट; जिद्द-मेहनतीच्या जोरावर अबरार आळंदचे यश
महाराष्ट्र वाणी
वालचंदनगर, दि. ५ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कळंब (रामवाडी) येथील फळ विक्रेत्याचा मुलगा अबरार आयुब आळंद याने देशातील अत्यंत कठीण समजली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अवघ्या २३ व्या वर्षी मिळवलेल्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अबरारचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
अबरार आळंद यांचे वडील आयुब जंगबहादुर आळंद हे वालचंदनगर परिसरातील आठवडी बाजारात फळ विक्रीचा छोटासा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई गृहिणी आहेत. साध्या परिस्थितीत वाढलेल्या अबरारने सुरुवातीपासूनच सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने दररोज तब्बल दहा ते बारा तास अभ्यास करत कठोर परिश्रम घेतले.
अबरारचे प्राथमिक शिक्षण भारत चिल्ड्रन अकॅडमी, वालचंदनगर येथे झाले. पुढे अकरावी-बारावीचे वाणिज्य शाखेतील शिक्षण बीएमसीसी कॉलेज, पुणे येथे झाले, तर बी.कॉमचे शिक्षण एमएमसीसी कॉलेज, पुणे येथे पूर्ण केले.
त्याने नोव्हेंबर २०२० मध्ये सीए फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर मे २०२२ मध्ये सीए इंटरमिजिएट परीक्षा पास केली. पुढे २०२५ मध्ये सीए फायनलचा पहिला ग्रुप उत्तीर्ण झाला आणि जानेवारी २०२६ मध्ये दुसरा ग्रुप उत्तीर्ण करत अखेर चार्टर्ड अकाउंटंट होण्याचे स्वप्न साकार केले.
अबरारच्या या यशामध्ये त्याचे आई-वडील, भाऊ-बहिणी, शिक्षक आणि मित्र यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्याने सांगितले. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) पुणे शाखेमार्फत मिळालेल्या संगणक प्रशिक्षण, संभाषण कौशल्य आणि स्किल डेव्हलपमेंट मार्गदर्शनाचा मोठा फायदा झाल्याचेही त्याने नमूद केले.
देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा निकाल १ मार्च २०२६ रोजी जाहीर झाला. या निकालात अबरार आळंद यांनी मिळवलेल्या यशामुळे परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
कुटुंबातील यशाची परंपरा कायम
अबरार आळंद यांच्या कुटुंबात शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमधील यशाची परंपरा आहे. त्यांचे चुलत बंधू वसीम आळंद हे चार्टर्ड अकाउंटंट असून दुसरे चुलत बंधू आजम आळंद हे पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून कार्यरत आहेत. अबरारनेही ही परंपरा पुढे नेत कुटुंबाचा आणि समाजाचा मान उंचावला आहे.
समाजासाठी प्रेरणादायी आदर्श
साध्या कुटुंबातून आलेल्या अबरार आळंद यांच्या यशामुळे मुस्लिम समाजातील तरुणांसमोर शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. आर्थिक अडचणी असूनही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, हे अबरारने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.
— शिक्षणाची जिद्द असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी यशाचा मार्ग नक्कीच सापडतो.