पाणीटंचाईने नागरिक हैराण; खासगी टँकरचालकांची चांदी, मनपाच्या टँकरसाठी प्रतीक्षा!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २५ :- शहरात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांना पिण्याच्या आणि दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कमी पावसामुळे बोअरवेल आणि विहिरींच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये खासगी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यातच महापालिकेच्या टँकरसाठी जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असल्याचे समोर येत आहे.
खासगी टँकरच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे पाण्याचे बजेट कोलमडले आहे. यापूर्वी दोन हजार लिटर पाण्याचा टँकर ४०० रुपयांत मिळत होता. मात्र, आता त्यासाठी ६०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहेत. पाच हजार लिटरच्या टँकरचे दरही ५०० ते ६०० रुपयांवरून थेट ९०० ते १२०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
खासगी टँकर व्यवसायाची कोट्यवधींची उलाढाल
शहरात सध्या १ हजार ६०० पेक्षा अधिक खासगी टँकर कार्यरत असल्याचा अंदाज आहे. या व्यवसायातून दररोज अडीच कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होत असल्याचे सांगितले जात आहे. पाणीटंचाईमुळे मागणी वाढत असताना खासगी टँकरचे दरही वाढल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी होत आहे.
सातारा-देवळाईसह अनेक भागांना फटका
सातारा-देवळाई, बीड बायपास, हर्सूल, पडेगाव, मिटमिटा आणि जटवाडा रोड परिसरात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र झाली आहे. या भागांतील रहिवाशांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होत नसल्याने खासगी टँकर मागवावे लागत आहेत.
दुसरीकडे, महापालिकेच्या ग्रुप टँकर योजनेतून ३६६ रुपयांत पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठीही नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याची परिस्थिती आहे.
सातारा-देवळाईसाठी अतिरिक्त टँकरचे नियोजन
शहरातील वाढती पाण्याची मागणी आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन सातारा-देवळाई परिसरात अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
एकीकडे महापालिकेच्या टँकरसाठी प्रतीक्षा आणि दुसरीकडे खासगी टँकरचे वाढते दर, अशा दुहेरी संकटात संभाजीनगरकर सापडले आहेत. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित