कृषी संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावा – आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील
परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभास उपस्थिती; पीएच.डी.धारक संशोधकांचे केले अभिनंदन
परभणी दि २१ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी आज परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभास उपस्थिती लावली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापकवर्ग आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर आमदार डॉ. पाटील यांनी विद्यापीठाशी असलेल्या आपल्या कौटुंबिक आणि भावनिक नात्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचे वडील डॉ. व्ही. के. पाटील यांनी या विद्यापीठात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. तसेच अनेक वर्षे हे विद्यापीठ त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्याचे ठिकाण राहिले होते. त्यामुळे विद्यापीठातील अनेक प्रसंग आणि आठवणी आजही त्यांच्या मनात कायम असून, आज या ठिकाणी उपस्थित राहताना वेगळाच आनंद अनुभवायला मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दीक्षांत समारंभात पीएच.डी. पदवी संपादन करणाऱ्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यापीठात सुरू असलेल्या विविध कृषी संशोधन प्रकल्पांची, आधुनिक शेती तंत्रज्ञानाची आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहितीही त्यांनी जाणून घेतली.
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी संशोधन महत्त्वाचे
कृषी संशोधन हे शेतकऱ्यांच्या समृद्धीचे आणि शेतीच्या शाश्वत विकासाचे महत्त्वाचे माध्यम आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यामुळे शेती अधिक उत्पादनक्षम, आधुनिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असे मत आमदार डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.
युवा संशोधकांचे ज्ञान, कृषी विद्यापीठांचे संशोधन आणि शेतकऱ्यांचे अथक परिश्रम यांच्या समन्वयातून मराठवाड्याच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित