खिशात अवघे २४ रुपये घेऊन मुंबईत आलेल्या जळगावच्या भूषण ठाकरेने KBC मध्ये जिंकले १ कोटी; थेट ७ कोटींच्या प्रश्नापर्यंत धडक!
जळगाव | विशेष प्रतिनिधी
दि २३ :- परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मनात जिद्द आणि डोळ्यांत स्वप्न असेल तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो, याचा प्रत्यय जळगावच्या भूषण ठाकरे यांनी दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बलवाडी या छोट्याशा गावातून आलेल्या भूषण यांनी देशातील लोकप्रिय टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती'च्या (KBC) १८ व्या पर्वात तब्बल १ कोटी रुपये जिंकत इतिहास घडवला आहे. विशेष म्हणजे, या पर्वातील पहिले करोडपती होण्याचा मानही त्यांनी पटकावला आहे.
मात्र, भूषण यांचा हा प्रवास केवळ एका कोटींच्या विजयाची कहाणी नाही, तर संघर्षावर मात करून स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या एका सामान्य तरुणाच्या असामान्य जिद्दीची प्रेरणादायी गाथा आहे.
घरची परिस्थिती हलाखीची, पण शिक्षणाचे स्वप्न मोठे!
भूषण यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. वडील रोजंदारीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, तर आईची प्रकृतीही वारंवार बिघडत होती. घरात अनेक अडचणी असतानाही वडिलांनी मुलाच्या शिक्षणात कोणतीही कमतरता भासू दिली नाही. परिस्थितीशी दोन हात करत भूषण यांनी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा प्रवास सुरू ठेवला.
खिशात फक्त २४ रुपये, डोळ्यांत मोठे स्वप्न!
भूषण यांच्या संघर्षातील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे, एकेकाळी खिशात अवघे २४ रुपये घेऊन त्यांनी मुंबईत पाऊल ठेवले होते. परिस्थितीची जाणीव होती, अडचणींचा डोंगर समोर होता; पण काहीतरी मोठे करून दाखवण्याची जिद्द त्यांच्या मनात कायम होती.
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. गेल्या दीड वर्षांपासून घरापासून दूर राहून त्यांनी आपल्या ध्येयासाठी कठोर मेहनत घेतली. परिस्थितीने अनेकदा परीक्षा घेतली, मात्र त्यांनी हार मानली नाही.
अमिताभ बच्चन यांच्या मंचावर ज्ञानाचा डंका!
अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आणि भूषण यांना थेट अमिताभ बच्चन यांच्यासमोर KBC च्या हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. आपल्या ज्ञानाच्या जोरावर प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी एकामागून एक टप्पे पार केले आणि तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम जिंकली.
विशेष म्हणजे, त्यांची मजल आता थेट ७ कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचली आहे. मात्र, त्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले की खेळातून माघार घेतली, याबाबत अद्याप अधिकृत प्रोमोमधून स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
बलवाडीपासून देशाच्या मंचापर्यंत!
एका सामान्य कुटुंबातील, मजुरी करणाऱ्या वडिलांच्या मुलाने आपल्या मेहनतीच्या बळावर देशाच्या लोकप्रिय मंचावर मिळवलेले हे यश केवळ भूषण ठाकरे यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरले आहे.
भूषण यांचा प्रवास आजच्या तरुणांसाठी मोठा संदेश देणारा आहे. श्रीमंती वारशाने मिळाली नाही, परिस्थिती अनुकूल नव्हती, हातात पैसा नव्हता; पण ज्ञान, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी कोटींचे स्वप्न सत्यात उतरवले!