दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा ५ किलो धान्य मिळणार; ३ किलो तांदूळ आणि २ किलो गव्हाचा समावेश

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई दि २५ :- राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या लाखो शेतकरी कुटुंबांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्यातील ३३ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील तब्बल ४२ लाख ३० हजार ७८३ पात्र शेतकरी कुटुंबांना पुढील तीन महिने मोफत अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (२५ नोव्हेंबर) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

तीन महिने धान्याचा खर्च वाचणार!

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रस्तावानुसार, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) तसेच थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेत समाविष्ट नसलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा पाच किलो धान्य मोफत दिले जाणार आहे. यामध्ये तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गव्हाचा समावेश असेल. सलग तीन महिने हा लाभ मिळणार असल्याने प्रत्येक पात्र लाभार्थ्याला एकूण १५ किलो धान्य उपलब्ध होणार आहे.

४२ लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबांना फायदा

दुष्काळामुळे शेतीचे उत्पन्न घटले असून अनेक ग्रामीण कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाई, घटलेले पीक उत्पादन आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्याचा खर्च भागवताना शेतकरी कुटुंबांची मोठी ओढाताण होत आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या या निर्णयामुळे पात्र कुटुंबांना काहीसा आर्थिक आधार मिळणार आहे.

कोणाला मिळणार मोफत धान्य?

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) आणि डीबीटी योजनेत समाविष्ट नसलेल्या ३३ जिल्ह्यांतील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार, एकूण ४२ लाख ३० हजार ७८३ लाभार्थी या निर्णयाच्या कक्षेत येणार आहेत.

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या लाखो शेतकरी कुटुंबांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार असून आता प्रत्यक्ष धान्य वितरण कधीपासून सुरू होते, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित