जळगाव सपकाळच्या भिकन रोजेकर यांची IPS/IRS अधिकारी म्हणून निवड; ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या हस्ते गौरव!

जळगाव सपकाळच्या भिकन रोजेकर यांची IPS/IRS अधिकारी म्हणून निवड; ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या हस्ते गौरव!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही, हे जालना जिल्ह्यातील जळगाव सपकाळ येथील शेतकरी पुत्र भिकन रोजेकर यांनी सिद्ध करून दाखवले आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या भिकन रोजेकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश संपादन करत IPS/IRS अधिकारी म्हणून निवड मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जळगाव सपकाळ गावासह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या यशाबद्दल छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तथा IPS अधिकारी मा. प्रकाश जाधव यांच्या शुभहस्ते भिकन रोजेकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी रोजेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. सामान्य पार्श्वभूमीतून येत देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या यशामुळे गावाचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल झाले असून, ग्रामीण भागातील असंख्य युवकांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठे स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

भिकन रोजेकर यांचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीचे यश नाही, तर ग्रामीण भागातील प्रत्येक होतकरू तरुणासाठी प्रेरणादायी संदेश आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी ध्येय निश्चित असेल आणि मेहनतीची तयारी असेल तर यशाला गवसणी घालता येते, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.

महाराष्ट्र वाणीच्या वतीने भिकन रोजेकर यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित