सिल्लोड तहसीलदार सागर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई! बोरगाव बाजार परिसरात वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त
सिल्लोड दि २४ - तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. तहसीलदार सागर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या वाळू पथकाने बोरगाव बाजार-धोंडखेडा परिसरात धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहाथ पकडून जप्त केला. या कारवाईमुळे अवैध वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
बोरगाव बाजार-धोंडखेडा परिसरातील नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून तिची वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या पथकाने नदीपात्राजवळ सापळा रचला. यावेळी अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर (क्रमांक MH 20 FP 0147) पथकाच्या हाती लागला. महसूल कर्मचाऱ्यांनी तातडीने ट्रॅक्टर ताब्यात घेत पुढील दंडात्मक व कायदेशीर कारवाईसाठी सिल्लोड तहसील कार्यालयात जमा केला.
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचे मालक पोपट दशरथ शेजुळ असून, ट्रॅक्टर चालकाचे नाव कडुबा नामदेव भोटकर असे आहे.
तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली पथकाची धडक
तहसीलदार सागर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी गणेश पल्लवे, मुख्तार शहा, नंदू बन्सवाल, वाल्मीक सुरडकर, पवन सोनुने आणि महसूल सेवक दुर्गेश गिरी यांनी ही कारवाई यशस्वी केली.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना प्रशासनाचा इशारा!
नदीपात्रातील अवैध वाळू उपसा आणि बेकायदेशीर वाहतुकीमुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून शासनाच्या महसुलालाही फटका बसतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे.