अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम अन् दोनपेक्षा अधिक अपत्यांचा मुद्दा! सात नगरसेवकांच्या अपात्रतेवर सुनावणी; पुढील तारखा निश्चित

अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम अन् दोनपेक्षा अधिक अपत्यांचा मुद्दा! सात नगरसेवकांच्या अपात्रतेवर सुनावणी; पुढील तारखा निश्चित

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २३ :- महानगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या नगरसेवक अपात्रता प्रकरणांनी आता वेग घेतला आहे. अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम आणि दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याच्या मुद्द्यांवरून नगरसेवकांच्या सदस्यत्वाला आव्हान देण्यात आले असून, या प्रकरणी सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) महानगरपालिकेच्या निवडणूक विभागामार्फत सुनावणी घेण्यात आली. त्यामुळे संबंधित नगरसेवकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आजच्या सुनावणीनंतर संबंधित प्रकरणांमध्ये पुढील सुनावणीसाठी तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

नगरसेवकाचे नाव पुढील सुनावणी

फिरोज खान २८ डिसेंबर २०२६

सय्यद उसामा अब्दुल कादरी २८ डिसेंबर २०२६

शाहीन पटेल २१ डिसेंबर २०२६

अली मीर वाजिद ३० नोव्हेंबर २०२६

मयूर वंजारी २८ डिसेंबर २०२६

शेख नर्गिस ३० नोव्हेंबर २०२६

मेराज खान ३० नोव्हेंबर २०२६

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम १०(१) व १०(१-ड) अंतर्गत नगरसेवकांच्या सदस्यत्वाच्या अपात्रतेसंदर्भात ही सुनावणी पार पडली. महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या यादीत एकूण आठ प्रकरणांचा समावेश होता. यामध्ये अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामासंदर्भातील तक्रारींसह अन्य अपात्रतेच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

सात नगरसेवकांना पुढील सुनावणीच्या तारखा

या प्रकरणांमध्ये संबंधित नगरसेवकांसह तक्रारदारांची नावेही सुनावणीच्या यादीत नमूद करण्यात आली आहेत. काही तक्रारींमध्ये दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याच्या कारणावरूनही सदस्यत्वाच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

आता लक्ष पुढील सुनावणीकडे!

महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या सदस्यत्वाबाबत उपस्थित झालेल्या या प्रश्नांमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संबंधित तक्रारींमध्ये कितपत तथ्य आहे, कायदेशीर सुनावणीत कोणते मुद्दे समोर येतात आणि अखेरीस नगरसेवकांच्या सदस्यत्वाबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, केवळ तक्रार दाखल झाली म्हणून नगरसेवक अपात्र ठरत नाहीत. सक्षम प्राधिकरणाच्या अंतिम निर्णयानंतरच या प्रकरणांचे चित्र स्पष्ट होणार आहे.