जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात ग्रामीण पोलिसांची धडक! जुगार अड्ड्यांवर छापे; गांजा विक्री करणाऱ्या महिलेलाही अटक, ११.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात ग्रामीण पोलिसांची धडक! जुगार अड्ड्यांवर छापे; गांजा विक्री करणाऱ्या महिलेलाही अटक, ११.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त
जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात ग्रामीण पोलिसांची धडक! जुगार अड्ड्यांवर छापे; गांजा विक्री करणाऱ्या महिलेलाही अटक, ११.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २३ :- ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. जुगार अड्डे, अमली पदार्थांची अवैध विक्री आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, एकाच मोहिमेत जुगाराच्या दोन अड्ड्यांवर छापे टाकत १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर करमाड येथे घरातून गांजाची विक्री करणाऱ्या एका महिलेलाही पोलिसांनी पकडले आहे. या कारवायांमध्ये जुगारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांसह रोख रक्कम, मोबाईल आणि गांजा असा एकूण ११ लाख ८९ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गोपनीय माहितीच्या आधारे जुगार अड्डे आणि अमली पदार्थ विक्रीच्या ठिकाणांवर छापेमारी केली जात आहे.

सिल्लोडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९ जण ताब्यात

दि. २३ नोव्हेंबर रोजी सिल्लोड ते भवन रस्त्यावरील एच.पी. पेट्रोलपंपाच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पैशांवर तिरट नावाचा पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने अचानक छापा टाकला. यावेळी गोलाकार बसून जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २६ हजार ४०० रुपये रोख, सात मोबाईल फोन, १४ मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १० लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंगरगावातही जुगार अड्डा उद्ध्वस्त; तिघे ताब्यात, तिघे फरार

सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव शिवारात सुरू असलेल्या आणखी एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तर अन्य तीन आरोपी पोलिसांना पाहून घटनास्थळावरून पसार झाले.

पोलिसांनी घटनास्थळावरून ४ हजार ७२० रुपये रोख, चार मोबाईल फोन आणि एक मोटारसायकल असा एकूण १ लाख १५ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणीही सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा प्रकारे सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण १२ जणांना ताब्यात घेतले असून, १५ मोटारसायकली, ११ मोबाईल फोन आणि ३१ हजार १२० रुपये रोख रकमेसह एकूण ११ लाख १८ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

करमाडमध्ये घरातून गांजा विक्रीचा प्रकार उघड; ५० वर्षीय महिला ताब्यात

दरम्यान, दि. २१ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयासिंग राजपूत यांना करमाड येथे एका महिलेकडून गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि करमाड पोलीस ठाण्याच्या पथकाने सक्षम अधिकारी, रासायनिक विश्लेषक, पंच आणि एफएसएल पथकाच्या उपस्थितीत करमाड येथील बेबी संतोष साळुंके (वय ५०, रा. करमाड) यांच्या राहत्या घरी छापा टाकला.

घराची झडती घेतली असता पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये हिरवट व काळपट रंगाचा उग्र वास असलेला १ किलो ४१९ ग्रॅम सुका गांजा आढळून आला. हा गांजा विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. पोलिसांनी गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत ७० हजार ९५० रुपये आहे.

याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३०/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करमाड पोलीस करीत आहेत.

या सर्व कारवाया पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयासिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस हवालदार सचिन राठोड, सुनील गोरे, गोपाल पाटील, संतोष डोंगरे, पोलीस अंमलदार बलबीरसिंग बहुरे, शिवाजी मगर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

एकीकडे जुगार अड्ड्यांवर छापेमारी, तर दुसरीकडे अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कारवाई सुरू झाल्याने ग्रामीण भागातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळातही अशा अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम सुरू राहणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित