वाळू माफियांवर तहसीलदार सागर वाघमारे यांची धडक कारवाई! दोन ट्रॅक्टर जप्त

चिंचवण आणि देऊळगाव बाजार शिवारात महसूल पथकाची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू

वाळू माफियांवर तहसीलदार सागर वाघमारे यांची धडक कारवाई! दोन ट्रॅक्टर जप्त
वाळू माफियांवर तहसीलदार सागर वाघमारे यांची धडक कारवाई! दोन ट्रॅक्टर जप्त

सिल्लोड (प्रतिनिधी) दि. २२ :- सिल्लोड तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तहसीलदार सागर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार सागर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने गस्त घालत कारवाईचे नियोजन केले.

यावेळी चिंचवण शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर, तर देऊळगाव बाजार शिवारात दुसरा ट्रॅक्टर पथकाच्या हाती लागला. दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले असून, संबंधित वाहनधारकांविरोधात दंडात्मक व कायदेशीर कारवाईची प्रक्रिया तहसील कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.

या कारवाईत तहसीलदार सागर वाघमारे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी विशाल दुनगहू आणि महसूल सेवक दुर्गेश गिरी यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा तहसीलदार सागर वाघमारे यांनी दिला आहे.

महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर आता कारवाईचा दबाव वाढणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित