राज्यातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! ११ महिन्यांत ११ लाख रुग्णांना लाभ; सरकारचा २,८६९ कोटींचा खर्च
मुंबई दि २३ :- राज्यातील सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांसाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली आहे. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे राज्यातील पात्र कुटुंबांना आता दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळत आहेत. त्यामुळे गंभीर आजारांवरील महागड्या उपचारांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होत आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर २०२६ या अवघ्या ११ महिन्यांच्या कालावधीत राज्यातील ११ लाखांहून अधिक रुग्णांनी या योजनांचा लाभ घेतला आहे. या रुग्णांवर १७ लाखांपेक्षा अधिक उपचार करण्यात आले असून, त्यासाठी शासनाने तब्बल २ हजार ८६९ कोटी ४५ लाख रुपये खर्च केले आहेत.
कर्करोगापासून हृदयरोगापर्यंत उपचार मोफत
या आरोग्य योजनांमध्ये केवळ साध्या आजारांवरच नव्हे, तर गंभीर आणि खर्चिक आजारांवरही उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंडाचे विकार, अवयव प्रत्यारोपण, अपघात तसेच अन्य गंभीर आजारांसह एकूण २ हजार ३९९ प्रकारच्या उपचार आणि शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील पाच हजारांहून अधिक शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये या योजनेंतर्गत पात्र रुग्णांना कॅशलेस म्हणजेच पैसे न भरता उपचार घेता येतात.
७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही अतिरिक्त संरक्षण
वृद्ध नागरिकांसाठीही विशेष सुविधा देण्यात आली आहे. ७० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 'आयुष्मान वय वंदना' योजनेंतर्गत अतिरिक्त पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
राज्यात ४ कोटी ४५ लाख आयुष्मान कार्ड तयार
या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर आयुष्मान कार्ड तयार करण्यात आले आहेत. आजपर्यंत राज्यात ४ कोटी ४५ लाख आयुष्मान कार्डे, तर ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी १२ लाख २० हजार वय वंदना कार्डे तयार करण्यात आली आहेत.
आयुष्मान कार्ड कसे काढायचे?
ज्या नागरिकांकडे अद्याप आयुष्मान कार्ड नाही, त्यांनी ते लवकरात लवकर तयार करून घ्यावे. त्यासाठी पुढील ठिकाणी संपर्क साधता येईल.
आशा सेविका किंवा आशा कर्मचारी.
आपले सरकार सेवा केंद्र.
स्वस्त धान्य दुकान.
आयुष्मान भारत मोबाईल अॅप.
कार्ड तयार करण्यासाठी अद्ययावत शिधापत्रिका, आधार कार्ड आणि आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.
तक्रार किंवा अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक
योजना टोल फ्री क्रमांक
महात्मा फुले जन आरोग्य योजना १५५३८८
महात्मा फुले जन आरोग्य योजना १८००२३३२२००
आयुष्मान भारत योजना १४५५५
आयुष्मान भारत योजना १८००१११५६५
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन : आजारपणामुळे कर्ज काढण्याची किंवा जमीन-जुमला विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाच्या या आरोग्य योजनांचा लाभ घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील प्रत्येक पात्र सदस्याचे आयुष्मान कार्ड तयार आहे की नाही, याची खात्री करा. गंभीर आजार किंवा शस्त्रक्रियेची गरज भासल्यास योजनेत समाविष्ट रुग्णालयात उपचारांची पात्रता आणि उपलब्ध सुविधा आधी तपासून घ्या.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित