वाळूज औद्योगिक परिसरात गावठी पिस्तुलांची विक्री करण्याचा डाव उधळला! दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात; २ पिस्तूल, ४ काडतुसे जप्त
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- वाळूज औद्योगिक परिसरात गावठी पिस्तुलांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन तरुणांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी दोन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याशिवाय दुचाकी व मोबाईल फोनसह एकूण २ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर आणि सहायक पोलीस आयुक्त मजहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
महाराणा प्रताप चौकात पहिली कारवाई
गुरुवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी सुमारे अडीच वाजता महाराणा प्रताप चौक परिसरात पोलिसांनी पहिली कारवाई केली. विशेष पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तेजस राजू कांबळे (वय २१, रा. भविष्यदीप नगर, वडगाव कोल्हाटी) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला लपवून ठेवलेले एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
कामगार चौकात दुसऱ्या तरुणाला पकडले
दुसरी कारवाई त्याच दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कामगार चौकात करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप यांच्या पथकाने बलबीरसिंग प्रतापसिंग जाधव (वय २२, रा. अमीर पेठ, हैदराबाद, तेलंगणा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन आणि हिरो स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली.
औद्योगिक परिसरात शस्त्रांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने अवैध शस्त्रविक्रीचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करीत आहेत.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित