पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांविरोधात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आक्रमक; राज्यभर धरणे आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र वाणी
मुंबई (प्रतिनिधी) दि २८ :- राज्यातील विविध जिल्ह्यांत पत्रकारांवर होत असलेल्या कारवाया, धमक्या आणि प्राणघातक हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे पत्रकारितेचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया, व्हीओएम इंटरनॅशनल फोरम’ने आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के पाटील, राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया, अजितदादा कुंकुलोळ, नरेंद्र देशमुख यांनी सरकारवर जोरदार टीका करत पत्रकारांवरील अत्याचार तात्काळ थांबवावेत, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असे स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांत पत्रकारांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले आहे. अकोल्यात एका आमदाराविरोधात बातमी प्रसिद्ध केल्यामुळे टीव्ही नाईन मराठीचे गणेश सोनोने आणि साम टीव्हीच्या हर्षदा सोनोने यांच्यासह अन्य पत्रकारांवर हक्कभंग दाखल करून त्यांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेमुळे पत्रकारितेवर बंधने आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे.
नांदेडमध्ये पत्रकार मुक्ता कदम यांनी मनपा निवडणुकीदरम्यान जनहिताच्या प्रश्नांवर बातम्या दिल्यानंतर त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशासनाचा गैरवापर करून पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याची टीका यावरून होत आहे.
दरम्यान, श्रीरामपूर येथे पत्रकार दत्तात्रय खेमनर यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, तर रत्नागिरीतील चिपळूणमध्ये दीपक भागवत यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. पनवेलमध्येही एका पत्रकाराला धमकी मिळाल्याची घटना समोर आली आहे.
अर्धापूर (जि. नांदेड) येथे अवैध दारू विक्रीविरोधात बातमी दिल्यामुळे पत्रकार मनोज मन्नपूर्वे यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या पत्नी आणि गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या सर्व घटनांचा निषेध करत संघटनेचे संयोजक संचालक गोरक्षनाथ मदने आणि किशोर कारंजेकर यांनी पत्रकारांना गप्प बसवण्याचे प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याचे म्हटले आहे. पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुमार कडलग, संगम कोटलवार, सचिन मोहिते, कल्पेश महाले यांनी केली आहे.
यासंदर्भात पुढील आठवड्यात राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येणार असून, पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
— “पत्रकारांचा आवाज दाबला तर लोकशाहीचाच गळा घोटला जाईल!”