‘Smart School to Best School’ उपक्रमांतर्गत किराडपुरा उर्दू शाळेत विज्ञान प्रदर्शन; 150 विद्यार्थ्यांची वैज्ञानिक मॉडेल्स सादरीकरणात चमक
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १० :- महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्या ‘Smart School to Best School’ या संकल्पनेतून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सीपीएस किराडपुरा क्रमांक १ उर्दू शाळेत गुरुवार (दि. ६ मार्च २०२६) रोजी वार्षिक विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत झालेल्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित आकर्षक मॉडेल्स सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभाग क्र. २३ चे नगरसेवक सय्यद उसामा कादिर मौलाना यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अलकासरी दिना मोहम्मद, झहरा समीर बिन हैदरा तसेच प्रभाग क्र. २३ चे नगरसेवक सोहेल कुरेशी उपस्थित होते. महानगरपालिकेचे उपआयुक्त (DMC) व शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांनीही विशेष उपस्थिती लावली.
तसेच भारत तिंगोटे (Education Officer, CSMC), गोविंद बारबोटे (OS, CSMC), रामनाथ थोरे (ADEI, CSMC) आणि ज्ञानदेव सिंगाळे (APO, CSMC) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सुमारे १५० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मॉडेल्सचे मान्यवरांनी निरीक्षण करून त्यांच्या सर्जनशीलता, मेहनत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले तसेच विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले.
स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये इयत्ता १ ली (C) मधील इब्राहिम कुरेशी युसुफ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता २ री (A) मधील उम्मे हबीबा नुसरत खान हिला द्वितीय क्रमांक मिळाला, तर इयत्ता ३ री (A) मधील लुबना सिद्दीक वसीम हिने तृतीय क्रमांक मिळवला.
याशिवाय इयत्ता ५ वी (A) मधील जैन शेख साजिद यांनी Hydraulic Crane मॉडेल सादर करून पारितोषिक मिळवले. इयत्ता ४ थी (A) मधील दुवाशा फातिमा असद हिने Kidney Working Model सादर केले. उच्च गटात इयत्ता ७ वी (B) मधील बरिरा फातिमा मोहम्मद मसूद हिने Hologram मॉडेल सादर करून पारितोषिक पटकावले.
तसेच इयत्ता ६ वी (B) मधील आयशा नईम हिला उत्कृष्ट सादरीकरणासाठी गौरविण्यात आले. इयत्ता ८ वी मधील फातिमा हिने Smart City प्रकल्प सादर करून प्रशंसा मिळवली. रोबोटिक्स विभागात इयत्ता ७ वी (A) मधील खान अब्दुल उल कादर याने Line Follower Robot सादर केला, तर शेख मरसिया इलियास हिने Smart Platform प्रकल्प सादर करून उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले.
या यशस्वी कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
— विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक जिज्ञासा वाढवणारे असे उपक्रम भविष्यातील संशोधक घडवण्याची प्रेरणा देतात.