राज्यात उन्हाचा तडाखा तीव्र; अकोल्यात पारा 40.8°, अनेक शहरांत चाळीशीकडे वाटचाल
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ८ :– राज्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मार्चच्या सुरुवातीलाच उष्णतेने कडाडायला सुरुवात केली असून अनेक शहरांतील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.
रविवारी नोंदवण्यात आलेल्या तापमानानुसार अकोला येथे राज्यातील सर्वाधिक 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ अमरावती येथे 40.6 अंश, तर वर्धा जिल्ह्यात 40 अंश तापमान नोंदले गेले. विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. सोलापूर येथे 39.6 अंश, पुणे (लोहगाव) येथे 38.5 अंश, सांगली येथे 38.3 अंश, तर छत्रपती संभाजीनगर येथे 38.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
तापमानात सातत्याने वाढ होत असल्यामुळे दुपारच्या वेळी उष्माघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरणे तसेच हलके कपडे परिधान करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून काही भागात उष्णतेची लाट जाणवू शकते.
दरम्यान, मार्चच्या सुरुवातीलाच चाळीशी पार करणाऱ्या तापमानामुळे राज्यातील नागरिकांना यंदाचा उन्हाळा अधिक कडक जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.