सभापती निवडीआधी राजकीय हलचल! भाजपचे सदस्य सहलीवर; सिल्लोड पंचायत समितीत काठावर बहुमत
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड दि ७ :- सिल्लोड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीपूर्वी तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. दगा-फटका टाळण्यासाठी भाजपने आपल्या निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्यांना सहलीवर पाठवले असून, मंगळवारी (दि.१०) होणाऱ्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिल्लोड पंचायत समितीत एकूण १८ सदस्य आहेत. त्यापैकी भाजपचे १० तर शिवसेनेच्या (शिंदे गट) ८ सदस्यांची निवड झाली आहे. बहुमत काठावर असल्याने भाजपने आधीच सावध पवित्रा घेतला असून, सदस्यांची एकजूट कायम राहावी यासाठी त्यांना सहलीवर पाठवण्यात आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मंगळवारी पंचायत समितीला तब्बल चार वर्षांनंतर सभापती आणि उपसभापती मिळणार आहेत. तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत झाली होती. जिल्हा परिषदेत ९ पैकी शिवसेनेचे ६ तर भाजपचे ३ सदस्य निवडून आले आहेत. मात्र पंचायत समितीत भाजपने १० जागा जिंकत वर्चस्व राखले आहे.
गेल्या कार्यकाळातही भाजपकडे बहुमत असतानाही अडीच वर्षांनंतर दोन सदस्यांना आपल्या बाजूला घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी सत्ता पलटवली होती. त्यामुळे यावेळी अशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजपने आधीच खबरदारी घेतली आहे.
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, भाजपमध्ये ऐनवेळी मतभेद झाले तर शिवसेना पुन्हा राजकीय डाव टाकू शकते. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच दोन्ही पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत.
दरम्यान, पंचायत समितीच्या सभापती पदासाठी महिला (ओपन) आरक्षण असल्याने यावेळी सभापतीपदी महिलेचीच निवड होणार आहे. भाजपकडून ७ महिला आणि ३ पुरुष सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे सभापती महिला आणि उपसभापती पदावर पुरुष सदस्याची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सभापतीपदासाठी भाजपकडून अनिता सुरेश बनकर आणि वृषाली सुनील मिरकर यांची नावे चर्चेत आहेत. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या बैठकीनंतर जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मंगळवारी दुपारी पंचायत समिती सदस्यांची विशेष बैठक घेऊन सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या बैठकीस पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाचे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) नीलेश अपार उपस्थित राहणार आहेत.
आता मंगळवारी होणाऱ्या निवडीत नेमकी सत्ता कुणाच्या हाती जाते, याकडे संपूर्ण सिल्लोड तालुक्याचे लक्ष लागले आहे.