“३४ वर्षांची ज्ञानसेवा पूर्ण; मुस्तफा अकबर शाह यांचा भव्य सत्कार सोहळा अंभईत रंगणार!”
महाराष्ट्र वाणी
अंभई (सिल्लोड) दि २८ :- शिक्षण क्षेत्रात तब्बल ३४ वर्षे ४ महिने निष्ठेने सेवा बजावणारे केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक श्री. मुस्तफा अकबर शाह हे दि. ३० मार्च २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेला मानवंदना देण्यासाठी अंभई येथे भव्य सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा जि.प. केंद्र प्राथमिक शाळा, अंभई (ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे सोमवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, श्री. मुस्तफा अकबर शाह यांचा सपत्निक सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. रमेशजी ठाकूर (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सिल्लोड) असणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. राजीवजी फुसे (जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी), मा. श्री. रामचंद्रजी मोरे (गट समन्वयक) आणि मा. श्री. डी. के. फुसे (माजी जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी) यांची उपस्थिती राहणार आहे. याशिवाय तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व केंद्रीय मुख्याध्यापक यांचाही मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे.
या सोहळ्याचे आयोजन अंभई केंद्रातील सर्व जि.प. उच्च प्राथमिक व प्राथमिक शाळांच्या वतीने करण्यात आले असून, कार्यक्रमानंतर दुपारी २ ते ४ या वेळेत प्रीतीभोजनाचे आयोजनही करण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या श्री. मुस्तफा अकबर शाह यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा सोहळा एक प्रेरणादायी क्षण ठरणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
“शिक्षणाच्या सेवेतील हा सुवर्णप्रवास – आता गौरवाचा सोहळा, उपस्थितीनेच होईल अधिक उजळा!”