लोहारा ग्रामपंचायतीत 34 लाखांचा मोठा अपहार! माजी सरपंच-अधिकाऱ्यावर गुन्हा; दोघेही फरार

लोहारा ग्रामपंचायतीत 34 लाखांचा मोठा अपहार! माजी सरपंच-अधिकाऱ्यावर गुन्हा; दोघेही फरार
लोहारा ग्रामपंचायतीत 34 लाखांचा मोठा अपहार! माजी सरपंच-अधिकाऱ्यावर गुन्हा; दोघेही फरार

महाराष्ट्र वाणी

लोहारा (प्रतिनिधी) दि १५ :- बाळापूर तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायतीत तब्बल 34 लाख 59 हजार 80 रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी माजी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा नोंद होताच दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथक तयार करून शोधमोहीम सुरू केली आहे.

या संदर्भात उरळ पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 147/2026 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा 12 मार्च 2026 रोजी रात्री 9.52 वाजता नोंदविण्यात आला.

या प्रकरणात गंगाधर सोमाजी गुंडेकर (वय 37), विस्तार अधिकारी, पंचायत समिती बाळापूर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार लोहारा ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच प्रवीण मोरे (रा. लोहारा, ता. बाळापूर) आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी गजेंद्र बाळापुरे (रा. एसबीआय कॉलनी, गोलखेड रोड, शेगाव, जि. बुलढाणा) यांनी संगनमत करून ग्रामपंचायतीच्या निधीचा 34,59,080 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार हा अपहार 24 नोव्हेंबर 2022 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर उरळ पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

सदर प्रकरणाचा तपास एपीआय कांबळे करीत असून दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथक तयार करण्यात आले असून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, अपहाराची रक्कम मोठी असल्यामुळे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. या घोटाळ्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामपंचायतीतील आर्थिक व्यवहारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

– ग्रामपंचायतीतील निधीवर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.