पैठणकडे जाणाऱ्या जड वाहतुकीत ९ ते ११ मार्चदरम्यान बदल

पैठणकडे जाणाऱ्या जड वाहतुकीत ९ ते ११ मार्चदरम्यान बदल
पैठणकडे जाणाऱ्या जड वाहतुकीत ९ ते ११ मार्चदरम्यान बदल

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.६ :- पैठण येथे ९ ते ११ मार्च दरम्यान होणाऱ्या संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जड वाहतुकीच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. या उत्सवासाठी राज्यभरातून सुमारे १२ ते १५ लाख भाविक विविध वाहनांनी तसेच पायी येत असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी आदेश जारी केले असून ९ ते ११ मार्च या कालावधीत जड वाहने खालील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत.

बदललेले वाहतूक मार्ग

१) शहागड–आपेगाव–पैठण मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहने शहागड–पाचोड मार्गे शहराकडे वळविण्यात येतील.

२) सोलापूर–धुळे एनएच-५२ महामार्ग (कचनेर फाटा, पोरगाव चौफुली, बिडकीन, शेकटा, इसारवाडी फाटा) मार्गे छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने एनएच-५२ वरून सरळ ए.एस. क्लब मार्गे छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर हायवेने पुढे जातील. उलट दिशेनेही याच मार्गाने वाहतूक सुरू राहील.

३) जालना–करमाड–कचनेर फाटा–पोरगाव–बिडकीन मार्गे येणारी वाहने करमाड–कचनेर फाटा–एनएच-५२ ते ए.एस. क्लब मार्गे छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर हायवेने पुढे वळविण्यात येतील.

४) छत्रपती संभाजीनगर–बिडकीन–पैठण मार्गे शेवगावकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर–वाळूज–गंगापूर मार्गे वळविण्यात येतील.

५) शेवगाव–पैठण–बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहने शेवगाव–नेवासा–गंगापूर–वाळूज मार्गे शहरात येतील.

६) इसारवाडी फाटा–शेकटा–बिडकीन–पैठणकडे येणारी जड वाहने इसारवाडी फाटा–ए.एस. क्लब–छत्रपती संभाजीनगर–बीड बायपास मार्गे पाचोडकडे वळविण्यात येतील.

पोलीस प्रशासनाने चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

👉 यात्रेच्या गर्दीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाची ही महत्त्वाची तयारी; प्रवाशांनी नियोजन करूनच प्रवास करावा.