करमाडमध्ये गांजाच्या शेतीवर धडक कारवाई; ५.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ४ :– करमाड पोलीस ठाणे हद्दीत मौजे फेरन जळगाव येथे गांजाची लागवड करून विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक छापा टाकत तब्बल ५ लाख ३१ हजार ९० रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गुप्त माहितीवरून सापळा
दि. ०२/०३/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना गोपनीय माहिती मिळाली की, फेरन जळगाव येथे एक इसम गांजाची लागवड करून त्याची जोपासना करत आहे तसेच वाळलेला गांजा विक्रीसाठी साठवून ठेवला आहे.
ही माहिती मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड व मा. अपर पोलीस अधीक्षक अन्नपुर्णासिंह मॅडम यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, करमाड पोलीस स्टेशनचे अधिकारी, राजपत्रित अधिकारी, कृषी अधिकारी व रासायनिक विश्लेषक पथक यांच्यासह संयुक्त कारवाई करण्यात आली.
शेतात १८२ गांजाची झाडे आढळली
मौजे फेरन जळगाव, शेत गट क्र. ९४ येथे छापा मारला असता संजय एकनाथ हिवराळे (वय ४३, रा. फेरन जळगाव) हा इसम शेतात आढळून आला. गव्हाच्या पिकालगत गांजाची झाडे लावून त्यांची निगा राखत असल्याचे स्पष्ट झाले.
कृषी अधिकारी व रासायनिक विश्लेषक पथकाने तपासणी करून ती झाडे गांजाची असल्याचे निष्पन्न केले. पंचनाम्यात एका मोसंबीच्या झाडामध्ये ३.५९१ किलो वाळलेला गांजा सापडला.
तसेच लहान-मोठ्या आकाराची एकूण १८२ गांजाची हिरवीगार झाडे (फुलोरा, बोंडे, बिया यांसह) आढळली. एकूण वजन ३४.२०९ किलो इतके निघाले असून त्याची किंमत ₹५,३१,०९०/- इतकी आहे.
एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल
संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपी संजय हिवराळे यास ताब्यात घेण्यात आले. करमाड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड व मा. अपर पोलीस अधीक्षक अन्नपुर्णासिंह मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत –
पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पो. उपनि. महेश घुगे, ग्रे.पो.उपनि. बळीराम काकडे, स.फौ. कडुबाळ थोटे, संतोष पाटील, सचिन राठोड, सुनिल गोरे, प्रमोद पाटील, दत्ता मुंडे, सचिन सोनार, अंगद तिडके, विजय धुमाळ, बलविरसिंग बहुरे, शिवाजी मगर, हरीभाऊ कोळगे, गणेश ढाकणे तसेच करमाड पोलीस स्टेशनचे पो.नि. सम्राटसिंग राजपूत, पो.उपनि. भारत निकाळजे, सुनिल लहाणे, नकुल बनसोडे, सोपान डकले, कृषी सहाय्यक शिवहारी देवरे तसेच रासायनिक विश्लेषक पथकातील अनुष्का खैर व साक्षी राठोड यांनी सहभाग घेतला.
ग्रामीण भागात बेकायदेशीर गांजाच्या शेतीवर पोलिसांचा करारा प्रहार; अशा कारवायांनी अवैध धंद्यांना लगाम बसणार का? — पाहत राहा ‘महाराष्ट्र वाणी’!