मराठवाड्यात हजारो कोटींची गुंतवणूक; छत्रपती संभाजीनगर ‘ईव्ही हब’कडे वाटचाल – मंत्री अतुल सावे
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २८ :- मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मराठवाडा प्रदेशात हजारो कोटींची गुंतवणूक होत असून, यामुळे तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे प्रतिपादन मंत्री Atul Save यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर येथील MGM University मध्ये आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय गोलमेज परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडलेली मते भविष्यातील प्रगतीसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठवाड्याचा इतिहास, भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक वास्तव लक्षात घेऊन सर्वांगीण विकासासाठी व्यापक ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील पाच वर्षांत छत्रपती संभाजीनगर शहर ‘ईव्ही हब’ म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
युवकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षण, प्रशिक्षण आणि आवश्यक सुविधा उभारण्यावर शासनाचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पर्यावरण बदल हा सामाजिक आणि आर्थिक घटकांवर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा मुद्दा असून, त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मराठवाड्यातील पाणी प्रश्न, उद्योगांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि स्थानिक नागरिकांवर होणारा परिणाम यांचा सखोल विचार करून संतुलित विकास साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाड्याच्या विकासाची नवी दिशा ठरवणाऱ्या या घोषणांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.