‘पक्षादेशाला हरताळ’ — जालना महापालिकेत काँग्रेसचे 7 नगरसेवक निलंबित; राजकारणात खळबळ!

‘पक्षादेशाला हरताळ’ — जालना महापालिकेत काँग्रेसचे 7 नगरसेवक निलंबित; राजकारणात खळबळ!

महाराष्ट्र वाणी

जालना( प्रतिनिधी) दि १ :- काँग्रेस पक्षाने शिस्तभंगाबाबत पुन्हा एकदा कडक भूमिका घेत जालना महापालिकेतील सात नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पक्षाच्या अधिकृत आदेशाला धाब्यावर बसवत भाजपला साथ दिल्याचा ठपका ठेवत ही मोठी कारवाई करण्यात आली असून, यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीदरम्यान काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले होते. या प्रक्रियेत काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेला विरोध करत भाजपच्या उमेदवारांना उघड पाठिंबा दिला. या घटनेची गंभीर दखल घेत काँग्रेसने तत्काळ चौकशी समिती स्थापन केली होती.

समितीच्या अहवालात संबंधित नगरसेवकांनी पक्षादेशाचे स्पष्ट उल्लंघन केल्याचे समोर आले. यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार फारूक सादीक तुंडीवाले, इमरान खान अमानुल्ला खान, फरहाना अ. रऊफ अन्सारी, सुनील अशोक बोरडे, मयुरी दिनेश देने, रुबीना माजीद पठाण आणि अनिल अशोक तिरुखे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले.

या संदर्भातील अधिकृत आदेश प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. या कारवाईद्वारे पक्षातील शिस्तभंग कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

याआधीही अंबरनाथ येथे अशाच प्रकारच्या पक्षविरोधी भूमिकेविरोधात काँग्रेसने कठोर पावले उचलली होती. त्यामुळे जालन्यातील कारवाई ही त्याच धोरणाचा पुढचा टप्पा मानली जात आहे.

दरम्यान, पक्षाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भविष्यातही अशीच कठोर कारवाई होईल, असा इशारा पक्ष नेतृत्वाने दिला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेबाबत ठोस संदेश मिळाला असून, येणाऱ्या काळात अशा घटनांवर अंकुश ठेवण्याचा पक्षाचा निर्धार अधिक दृढ झाल्याचे दिसत आहे.

 जालना कारवाईनंतर राजकीय वर्तुळात नवे समीकरण तयार होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!