मराठवाडा पदवीधर मतदारसंघ भाजपाकडेच ठेवावा; पक्ष नेतृत्वाकडे शिष्टमंडळाची मागणी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २८ :- आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर मतदारसंघ महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडेच कायम ठेवावा, अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली.
यासंदर्भात शिष्टमंडळाने आज रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन मतदारसंघातील राजकीय व संघटनात्मक परिस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी पदवीधर मतदारांची नोंदणी, संघटन मजबूत करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, पदवीधरांशी थेट संपर्क तसेच आगामी निवडणुकीच्या नियोजनावर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
मराठवाड्यातील पदवीधरांचे विविध प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेचा अधिक व्यापक उपयोग होणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने पक्ष नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे महायुतीतील जागावाटपात मराठवाडा पदवीधर मतदारसंघ भाजपाकडेच ठेवण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
या भेटीदरम्यान पदवीधर मराठवाडा संयोजक तथा माजी आमदार संजय केनेकर, प्रदेश सचिव प्रवीण घुगे, सहसंयोजक किरण पाटील, सहसंयोजक तथा निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, बीडचे बाळासाहेब केदार, लातूरचे विवेकानंद उजलंबकर आणि दत्तप्रसाद जाधव उपस्थित होते.
आगामी विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टीने मतदार नोंदणीपासून संघटनात्मक बांधणीपर्यंत विविध पातळ्यांवर तयारीला वेग देण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.