दगडफेक करणारी हरवलेली मनोरुग्ण महिला अखेर नातेवाइकांच्या ताब्यात; माणुसकी समूहाच्या प्रयत्नांना यश
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २९ :- जवाहरनगर पोस्ट हद्दीत दगडफेक करत असल्याने आढळून आलेल्या एका मनोरुग्ण महिलेच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात माणुसकी समूहाला यश आले आहे. दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या महिलेला अखेर आईच्या स्वाधीन करण्यात आले असून, भेटताच नातेवाइकांचे अश्रू अनावर झाले.
सदर महिलेबाबत फुलंब्री पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल होती. जवाहरनगर परिसरात ती दगडफेक करत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर ती मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तात्पुरत्या निवाऱ्यासाठी तिला माणुसकी वृद्ध सेवालयात दाखल केले.
माणुसकी वृद्ध सेवालयाच्या संचालिका पूजा पंडित यांनी महिलेची आपुलकीने विचारपूस करत तिला विश्वासात घेतले. चौकशीत तिने केवळ ‘सावंगी’ हे गावाचे नाव सांगितले. त्यानंतर फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय साहाने यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता, संबंधित महिलेची मिसिंग तक्रार दाखल असल्याची माहिती मिळाली. बीट जमादार कैलास राठोड यांच्या मदतीने नातेवाइकांशी संपर्क साधण्यात आला.
महिलेची ओळख पटताच तिची आई माणुसकी वृद्ध सेवालयात दाखल झाली. मुलीला पाहताच तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. आईने सांगितले की, वडील निधनानंतर मुलीला मोठा मानसिक धक्का बसला असून ती घरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. गेल्या दहा दिवसांपासून कुटुंबीय तिचा शोध घेत होते.
सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आज पोस्टे जवाहरनगर येथे महिलेची औपचारिक माहिती देत तिला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या संपूर्ण कार्यात फुलंब्री पोलीस निरीक्षक संजय साहाने, जवाहरनगर पोलीस उपनिरीक्षक मारुती खिल्लारे, बीट जमादार कैलास राठोड, पोलीस हवालदार हरिश्चंद्र नरके तसेच माणुसकी समूहाचे सुमित पंडित यांचे सहकार्य लाभले.
— माणुसकी अजून जिवंत आहे, याचा प्रत्यय देणारी ही घटना आहे.