तुकाराम मुंढेंचा शेगावात धडाका! प्रसिद्ध कचोरी सेंटरवर FDAची अचानक छापेमारी
महाराष्ट्र वाणी
शेगाव दि १२ :- अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधात विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत शिर्डीनंतर आता शेगावमधील प्रसिद्ध कचोरी विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई झाली आहे.
संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक शेगावमध्ये दाखल होत असतात. दर्शनासोबतच येथील कचोरीची चवही राज्यभर प्रसिद्ध असल्याने तिच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी बुलढाणा जिल्हा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक तपासणी मोहीम राबवली.
निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शेगावातील तीरथराम करमचंद शर्मा या नामांकित कचोरी प्रतिष्ठानाची पाहणी केली. यावेळी कचोरी तयार करण्यासाठी वापरले जाणारे खाद्यतेल, मसाले, बेसन, मैदा तसेच इतर कच्च्या मालाची सखोल तपासणी करण्यात आली.
कारवाईदरम्यान विविध खाद्यपदार्थांचे नमुने अधिकृत पद्धतीने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
तपासणीत भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित प्रतिष्ठानाविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार (FSSAI) कठोर कारवाई होऊ शकते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिर्डीतील प्रसाद विक्रेत्यांवरही एफडीएने अशीच धडक मोहीम राबवली होती. पेढा प्रसादाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आल्यानंतर तेथूनही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांवरील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.
तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाची उत्पादने तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर व्यापक तपासणी मोहीम सुरू असून आगामी काळात अशा कारवायांची व्याप्ती आणखी वाढविण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
👉 आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी ‘महाराष्ट्र वाणी’सोबत जोडलेले राहा.