“डॉ. जफर अहमद खान यांच्या नावाने रस्त्याला नामकरणाची मागणी; काँग्रेसचे महापौरांना निवेदन”
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २८ :- शहरातील संजयनगर ते बायजीपुरा हा महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता असून, या रस्त्यास दिवंगत माजी लोकप्रतिनिधी डॉ. जफर अहमद खान यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे.
शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर समीर राजूरकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात डॉ. खान यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून रस्त्याचे नामकरण करण्याची मागणी करण्यात आली.
डॉ. जफर अहमद खान यांनी २०१० ते २०१५ या कालावधीत नगरसेवक म्हणून काम करताना नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तसेच २०१३ ते २०१५ या काळात विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी प्रभावी भूमिका बजावत शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे नागरिकांमध्ये त्यांना विशेष मान आणि आदर प्राप्त झाला होता.
त्यांच्या सामाजिक व लोकहितकारी कार्याचा गौरव म्हणून संजयनगर-बायजीपुरा रस्त्यास “डॉ. जफर अहमद खान मार्ग” असे नामकरण करण्यात यावे, अशी ठाम भूमिका काँग्रेसने मांडली आहे.
यावेळी माजी सभापती इक्बालसिंग गिल, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, शेख कैसर बाबा, डॉ. सिकंदर शेख, योगेश थोरात, मोईन शेख हर्सूलकर, शफीक शहा, असदउल्ला शकील, बाबासाहेब पवार, सय्यद फय्याजोद्दिन, जयपाल दवणे, मुरलीधर बनसोडे, मुदस्सिर अन्सारी, नितेश सूर्यतले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 आता या मागणीवर महापालिका प्रशासन काय निर्णय घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे!