दिवाळीच्या गर्दीत मोबाईल चोरट्यांचा कट उधळला! जवाहरनगर पोलिसांची मोठी कारवाई; २२ महागडे मोबाईल, दोन दुचाकींसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

तेलंगणा राज्यातील टोळीचा पर्दाफाश; तीन पुरुषांसह एका महिलेला अटक

दिवाळीच्या गर्दीत मोबाईल चोरट्यांचा कट उधळला! जवाहरनगर पोलिसांची मोठी कारवाई; २२ महागडे मोबाईल, दोन दुचाकींसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
दिवाळीच्या गर्दीत मोबाईल चोरट्यांचा कट उधळला! जवाहरनगर पोलिसांची मोठी कारवाई; २२ महागडे मोबाईल, दोन दुचाकींसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ७ :- दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत नागरिकांचे महागडे मोबाईल चोरी करणाऱ्या तेलंगणा राज्यातील टोळीचा जवाहरनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तीन पुरुष आणि एका महिला आरोपीला ताब्यात घेत त्यांच्या कब्जातून तब्बल २२ महागडे मोबाईल फोन आणि दोन होंडा शाईन मोटारसायकली असा एकूण सुमारे ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत.

डी-मार्टमधील चोरीने तपासाला मिळाली दिशा

दि. ५ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजता शिवानी रुषभ यादव (वय २९, रा. गवळीपुरा) या पतीसह शहानूरमिया दर्गा परिसरातील डी-मार्टमध्ये दिवाळीची खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी बॅगेत ठेवलेला २० हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा A6X 5G मोबाईल गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९०/२०२६, कलम ३०३(२) बीएनएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खडी मशीन परिसरात पोलिसांचा सापळा

गुन्ह्याचा तपास सुरू असताना ७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील खडी मशीनच्या मोकळ्या मैदानात दोन दुचाकींवर काही जण चोरीचे मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी सापळा रचला.

यावेळी तीन संशयित पुरुष आणि एका महिलेला पोलिसांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता विविध कंपन्यांचे तब्बल २२ महागडे मोबाईल आढळून आले.

शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणी चोरीची कबुली

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपींनी डी-मार्ट शहानूरमिया दर्गा, छावणी बाजार, शिवाजीनगर, चिकलठाणा यांसह शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणांहून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये फिर्यादी महिलेचा चोरीस गेलेला ओप्पो A6X 5G मोबाईलही पोलिसांनी हस्तगत केला.

तेलंगणातील चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या कारवाईत पोलिसांनी रामनजी व्यंकटेश वड्डे (वय ५१), विनोद वड्डे (वय ३०), विजय वड्डे (वय २७), तिघेही मूळ रा. चौटुप्पल, जिल्हा यादाद्री, तेलंगणा, सध्या साजापूर, वाळूज, छत्रपती संभाजीनगर, तसेच गुंडला रजिता शंकर (वय ३२, मूळ रा. के. व्ही. रंगारेड्डी, तेलंगणा, सध्या साजापूर, छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून २२ महागडे मोबाईल आणि होंडा कंपनीच्या दोन काळ्या रंगाच्या शाईन मोटारसायकली (क्रमांक TS-07-JH-3308 आणि TS-07-JH-1529) असा एकूण ७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी

पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश जारवाल, महिला पोलीस अंमलदार रत्नमाला धुळे, प्रेमा हाके, पोलीस अंमलदार मारोती गोरे, राजेंद्र शिंदे आणि विजय सुरे यांनी ही कारवाई यशस्वी केली.

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत असताना नागरिकांनी आपल्या मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन या कारवाईच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.

महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित