टाऊन हॉल परिसरातील कुख्यात गुंडावर MPDAचा बडगा! उत्तम येटाळेची चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी
छत्रपती संभाजीनगर पोलिसांची कठोर कारवाई; वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त प्रविण पवार यांचे स्थानबद्धतेचे आदेश
छत्रपती संभाजीनगर, दि. ३ :- शहरातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाऊन हॉल परिसरात राहणारा उत्तम बाबासाहेब येटाळे (वय ३४) याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य पायरसी करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबतचा कायदा (MPDA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याला चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
उत्तम येटाळे याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, जबरी चोरीदरम्यान दुखापत पोहोचविणे, गृहअतिक्रमण, बेकायदेशीर मद्यवाहतूक, लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक उपद्रव निर्माण करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमानित करणे आणि धमकी देणे यांसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
त्याच्या वाढत्या गुन्हेगारी व धोकादायक कृत्यांना आळा घालण्यासाठी यापूर्वी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १२९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कठोर कारवाईचा निर्णय घेतला.
पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी MPDA कायद्याच्या कलम ३(१) अन्वये उत्तम येटाळे याला स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार ३१ ऑक्टोबर रोजी त्याला स्थानबद्धतेचा आदेश बजावून चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रविणा यादव तसेच पोलीस अंमलदार भगवान शिलोटे, दीपाली सोनवणे आणि महादेव दाणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असल्याचा संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित