“गुन्हेशाखेची मोठी कारवाई! शहरातील 18 चोरीच्या बाइक्स हस्तगत” सराईत दुचाकी चोर जेरबंद
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २७ :- शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हेशाखेने मोठी कारवाई करत सराईत मोटारसायकल चोराला अटक केली आहे. आरोपीकडून शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या एकूण 18 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 236/2026 अंतर्गत तपास सुरू असताना गुन्हेशाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी गजानन फकीरा जाधव (वय 26) हा त्याचा साथीदार सचिन भुजंगराव मिसाळ याच्यासोबत शहरातून मोटारसायकली चोरून बुलढाणा जिल्ह्यातील धाड परिसरात विक्री करत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर आणि त्यांच्या पथकाने धाड येथे सापळा रचून आरोपी गजानन जाधव याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हर्सुल, बेगमपुरा, सिडको, मुकुंदवाडी आणि एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी एकूण 18 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे शहरातील अनेक प्रलंबित दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांना आवाहन करताना पोलिसांनी जुनी दुचाकी किंवा चारचाकी खरेदी करताना वाहनांची कागदपत्रे तपासूनच व्यवहार करण्याचे सांगितले आहे. कागदपत्रांबाबत संशय वाटल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेच्या पथकाने केली.
वाचत रहा महाराष्ट्र वाणी — आपल्या शहरातील प्रत्येक मोठ्या घडामोडीचा वेगवान आणि विश्वासार्ह अपडेट!