क्रांती चौकात वंचितचा ‘मोदी हटाव’ नारा; पुतळा दहनाच्या भीतीने पोलिसांनीच पुतळा उचलला!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ११:- शहरातील क्रांती चौक परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. “मोदी हटाव, देश बचाव” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत विविध घोषणाबाजी केली.
आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही केंद्रीय मंत्र्यांचे नाव तथाकथित एपस्टीन फाईलमध्ये आल्याचा आरोप केला. तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींवर दबाव टाकत असल्याचा दावा करत, अमेरिका व फ्रान्ससोबत झालेल्या करारांमुळे देशाच्या सार्वभौमत्वावर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
दरम्यान, आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली. कार्यकर्ते पंतप्रधान मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करतील अशी भीती पोलिसांना वाटल्याने उपस्थित पोलिसांनी तो पुतळा ताब्यात घेतला आणि घटनास्थळावरून दूर नेला. त्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
देशाच्या हितासाठी मोदी सरकारला सत्तेतून हटवण्याची गरज असल्याचा दावा करत आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका मांडली.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य तथा नगरसेवक अमित भुईगल, जिल्हानिरीक्षक (पूर्व) योगेश बन, जिल्हाध्यक्ष (पूर्व) रामेश्वर तायडे, जिल्हाध्यक्ष (पश्चिम) रूपचंद गाडेकर, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष कोमल हिवराळे, शहराध्यक्ष पंकज बनसोडे, युवा शहराध्यक्ष (मध्य) संदीप जाधव, युवा शहराध्यक्ष (पश्चिम) राहुल मकासरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वाचत रहा — ‘महाराष्ट्र वाणी’ : तुमच्या शहरातील प्रत्येक हालचालीवर आमची नजर.