किराडपुरात रेशन धान्य व अंगणवाडी पोषण आहाराचा काळाबाजार उघड; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी

किराडपुरात रेशन धान्य व अंगणवाडी पोषण आहाराचा काळाबाजार उघड; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी
किराडपुरात रेशन धान्य व अंगणवाडी पोषण आहाराचा काळाबाजार उघड; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि १४ :- जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किराडपुरा परिसरात गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत रेशन धान्य आणि अंगणवाडीसाठीच्या पोषण आहाराच्या काळाबाजाराचा मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण 17 लाख 6 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल व वाहन जप्त करण्यात आले असून अनेक आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हे शाखेला 12 जून रोजी रात्री गोपनीय माहिती मिळाली होती की, हबीबिया मशिदीजवळील एमआर फंक्शन हॉल परिसरातील एका गोदामात रेशन धान्याचा साठा करून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी पाठविण्याची तयारी सुरू आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक आणि जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त छापा टाकला.

छाप्यात मोठ्या प्रमाणात रेशन धान्य आणि वाहन जप्त करण्यात आले. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 181/2026 दाखल करण्यात आला असून आरोपींवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7, पेट्रोलियम कायदा 1934 चे कलम 4 व 27 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 287 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत 15 लाख 75 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, याच ठिकाणाच्या लगतच्या खोलीत अंगणवाडीतील सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके तसेच गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी शासनाकडून पुरविण्यात येणारा पोषण आहार साठवून ठेवलेला आढळला. एक किलोच्या पॅकेटमधील खिचडीसाठीचा तांदूळ आणि मिक्स पावडर बाहेर काढून गोण्यांमध्ये भरल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी गुन्हा क्रमांक 182/2026 दाखल करण्यात आला असून आरोपींविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत 1 लाख 31 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात समीर वावर कुरेशी, फहाद लईक शुतरी आणि फरदीन गणी पठाण यांना अटक करण्यात आली आहे. तर आवेज कुरेशी, कलीम छोटू कुरेशी आणि त्यांचे इतर साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

या दोन्ही कारवाया पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आणि सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

रेशन धान्यासह अंगणवाडी पोषण आहाराच्या काळाबाजारावर झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे शहरातील अवैध साठेबाजांमध्ये खळबळ उडाली आहे.

– वाचत रहा महाराष्ट्र वाणी, सत्य आणि वेगवान बातम्यांसाठी!