एकीकडे मुलाची उमेदवारी, दुसरीकडे सुहास शिरसाठांना आशीर्वाद; अब्दुल सत्तारांच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) :- औरंगाबाद -जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीने या मतदारसंघातून सुहास शिरसाठ यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. दरम्यान, राज्याचे मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलानेही निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या लढतीकडे विशेष लक्ष लागले आहे.
याच दरम्यान एका सार्वजनिक कार्यक्रमात अब्दुल सत्तार आणि सुहास शिरसाठ हे एकाच मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमावेळी सत्तार यांनी शिरसाठ यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना शुभेच्छा दिल्याचे छायाचित्र समोर आले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या छायाचित्रामुळे राजकीय चर्चांना नव्याने उधाण आले आहे. एका बाजूला सत्तार यांच्या मुलाची उमेदवारी कायम असताना दुसऱ्या बाजूला महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला दिलेला पाठिंब्याचा संकेत मानला जाऊ शकणारा हा फोटो अनेक तर्क-वितर्कांना कारणीभूत ठरत आहे.
अब्दुल सत्तार यांची आगामी निवडणुकीतील भूमिका नेमकी काय असणार, याबाबत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि राजकीय जाणकारांमध्ये उत्सुकता वाढली असून पुढील काही दिवसांत या घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वाचा, पाहा आणि सर्वात आधी जाणून घ्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी — महाराष्ट्र वाणीसोबत!