अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंभईत बैठक! डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या पाठीशी उभे राहा; हरिदास शेलार यांचे आवाहन
अंभई दि २० :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंभई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष हरिदास पाटील शेलार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी मंत्री तथा सिल्लोड-सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला उपस्थित पदाधिकारी आणि पदवीधर मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा आयोजकांनी केला.
उच्चशिक्षित तरुणांच्या समस्या, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि प्रगतीशील भविष्याच्या दृष्टीने मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी आणि सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी डॉ. पाटील यांना पाठिंबा देण्याचे आवाहन उपस्थितांनी केले.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे सिल्लोड-सोयगाव विधानसभा अध्यक्ष उबेद बापू देशमुख, सरपंच रामदास पाटील दुतोंडे, उपसरपंच रईस शेठ देशमुख, डॉ. एच. डी. वडोदे, समाधान सर भुईगळ, माजी जिल्हा परिषद सदस्य दामू आण्णा गव्हाणे, रितेश जैस्वाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. अनिस बेग, विजय मांगुळकर आणि एकबाल देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना हरिदास पाटील शेलार यांनी डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना पाठिंबा दिल्याबद्दल मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांचे आभार मानले. तसेच सुशिक्षित तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पदवीधरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
सुशिक्षित आणि प्रगतीशील भविष्यासाठी डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित