पदवीधरांच्या प्रश्नांसाठी डॉ. प्रतापसिंह पाटील मैदानात; नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये साधला शिक्षकांशी संवाद!
शिक्षण, रोजगार आणि उद्योगांच्या संधी विस्तारण्यावर भर; पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार
नांदेड डि १२ :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी आपल्या ‘मराठवाडा पदवीधर संवाद दौरा २०२६’ अंतर्गत नांदेड येथील नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या पीपल्स कॉलेजला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक बांधव आणि उपस्थित मान्यवरांशी संवाद साधत पदवीधरांच्या विविध समस्या, शिक्षण क्षेत्रातील आव्हाने, रोजगाराच्या संधी आणि युवकांच्या भविष्याविषयी विचारविनिमय केला.
शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न केंद्रस्थानी
पदवीधरांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, शिक्षण क्षेत्रातील बदलती आव्हाने आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या विषयावर यावेळी चर्चा झाली. पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच शिक्षण आणि रोजगाराच्या संधी अधिक व्यापक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
पीपल्स कॉलेजच्या शैक्षणिक परंपरेचे कौतुक
थोर स्वातंत्र्यसैनिक आणि शिक्षणमहर्षी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा लाभलेल्या पीपल्स कॉलेजची वाटचाल प्रेरणादायी असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले. १९५० मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने ज्ञानदानाची परंपरा जपत समाजाच्या शैक्षणिक प्रगतीत योगदान दिले आहे. या संस्थेच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी महाविद्यालयाच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
पदवीधरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रित प्रयत्न
शिक्षण, रोजगार आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये अधिक संधी निर्माण होणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करत पदवीधरांच्या अपेक्षा आणि प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका डॉ. पाटील यांनी मांडली. पदवीधरांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी संवाद आणि सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या सदिच्छा भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान पाटील आलेगावकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास जी. सुकाळे, भिंगे सर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण • रोजगार • उद्योग
ज्ञानाचा वारसा जपूया, पदवीधरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया, असा संदेश या संवाद दौऱ्यातून देण्यात आला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा हा संवाद दौरा पदवीधरांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.
अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी