अवैध गुटखा वाहतूक उघडकीस: स्थानिक गुन्हे शाखेची ७२ लाखांची कारवाई

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १८ जून :- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७२ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक १७ जून २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई अजिंठा-सिल्लोड रस्त्यावरील आन्वी फाटा येथे करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की, एक आयशर वाहन (MH 18 BG 8046) अजिंठा येथून सिल्लोडकडे गुटख्याची अवैध वाहतूक करत आहे. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून संशयित वाहन थांबवले.
तपासणी दरम्यान वाहनामध्ये विमल पान मसाला व सुगंधीत तंबाखूची १३९ पोती आढळून आली. सदर मुद्देमाल व आयशर वाहनाची एकूण किंमत ₹७२,०५,०८०/- (अक्षरी बहात्तर लाख पाच हजार ऐंशी रुपये) इतकी आहे. वाहनचालकाचे नाव विकास सुभाष पाटील (रा. नंदाळे, ता. व जि. धुळे) असे असल्याचे निष्पन्न झाले.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर मुद्देमालाची पाहणी करण्यात आली. हा माल सार्वजनिक आरोग्यास हानिकारक असून, अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ आणि भारतीय दंड विधानातील विविध कलमांन्वये (123, 223, 274 इ.) कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या गुन्ह्याची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे.
कारवाईतील सहभागी अधिकारी व कर्मचारी:
पो. नि. सतीश वाघ, स्थानिक गुन्हे शाखा
स.पो.नि. पवन इंगळे, स्थानिक गुन्हे शाखा
पोलीस कर्मचारी: संतोष पाटील, वाल्मीक निकम, विठ्ठल डोके, गोपाल पाटील, कैलास राठोड, दिपक सुरोशे, निलेश कुडे, संजय तांदळे
अन्नसुरक्षा अधिकारी: मोहम्मद फरीद अब्दुल रशीद सिद्दीकी