आईचा त्याग, भावाचे कष्ट अन् एजाजची मेहनत; LAW CET मध्ये 99.99 पर्सेंटाइल
महाराष्ट्र वाणी
बीड (प्रतिनिधी) दि १० :- कठोर परिश्रम, अपार जिद्द आणि कुटुंबाच्या त्यागाच्या बळावर बीड जिल्ह्यातील एजाज महमूद बगवान यांनी MAH-LL.B. 3 Years CET-2026 परीक्षेत 99.99 पर्सेंटाइल मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
एजाज यांचा यशाकडे जाणारा प्रवास अनेक संघर्षांनी भरलेला आहे. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटात त्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून त्यांच्या भावाने भाजी विक्रीचा व्यवसाय करत कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. आईनेही मोठा त्याग करत मुलाच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. कुटुंबाच्या या पाठबळाला एजाज यांनी अथक मेहनतीची जोड देत यशाचे शिखर गाठले.
या यशामागे त्यांचे काका जमशेद बागवान, चुलत भाऊ फिरोज बागवान, मित्रपरिवार आणि मार्गदर्शकांचेही महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे एजाज यांनी नमूद केले. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची वाट न सोडता सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे हे यशस्वी फळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
एजाज बगवान यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर प्रेरणेचा आदर्श निर्माण झाला असून, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
👉 संघर्षावर मात करून यश मिळवणाऱ्या एजाज बगवान यांना ‘महाराष्ट्र वाणी’कडून हार्दिक शुभेच्छा; त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक सदिच्छा!