NEET परीक्षेसाठी ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त; ड्रोनद्वारे ठेवली जाणार नजर
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद ) दि २० :- देशभरात रविवारी (दि. 21 जून) होणाऱ्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. परीक्षेची गोपनीयता, सुरक्षा आणि पारदर्शकता राखण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
ग्रामीण हद्दीत संत तुकाराम महाविद्यालय (कन्नड), राजर्षी शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (पाथ्री, ता. फुलंब्री) आणि राजर्षी शाहू आर्ट्स, सायन्स व कॉमर्स कॉलेज (डोंगरगाव कवाड, ता. फुलंब्री) अशी एकूण तीन परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या तिन्ही केंद्रांवर मिळून १,२७२ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्ताचे नियोजन आणि कर्मचाऱ्यांचे ब्रीफिंग पूर्ण केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्बशोधक व नाशक पथक (BDDS) मार्फत परीक्षा केंद्रांची कसून तपासणी करून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे.
यंदा परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी आणि बारीक नजर ठेवण्यासाठी सर्व केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने विशेष निगराणी ठेवली जाणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड्स तैनात करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी विद्यार्थ्यांना कोणताही ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचे आवाहन केले आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यास आणि परीक्षेवर लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाचत राहा ‘महाराष्ट्र वाणी’ — तुमच्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी!