MPDA अंतर्गत तुषार मेहरा स्थानबद्ध; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी

MPDA अंतर्गत तुषार मेहरा स्थानबद्ध; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी
MPDA अंतर्गत तुषार मेहरा स्थानबद्ध; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २२ :- वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार तुषार सुंदरलाल मेहरा (वय 28) याच्याविरुद्ध वाढत्या गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हिडीओ पायरेट्स, बाळू तस्कर तसेच इतर विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या MPDA Act, 1981 च्या कलम 3(1) अंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, तुषार मेहरा हा संत रोहीदास चौक, मोची मोहल्ला, पदमपुरा, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून त्याच्याविरुद्ध वेदांतनगर आणि छावणी पोलीस ठाण्यांत विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून, घातक शस्त्राने दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, दंगा, चोरी, गृहअतिक्रमण, बेकायदेशीर दारू वाहतूक व विक्री, धारदार शस्त्र बाळगणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन, प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन यांसह अन्य गुन्ह्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी त्याच्याविरुद्ध भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 129 अन्वये प्रतिबंधक कारवाई तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 अन्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्याच्याकडून पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू राहिल्याने MPDA अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मझहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची प्रक्रिया राबविण्यात आली.

सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि वेदांतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद पालवे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानबद्धतेचा आदेश 19 सप्टेंबर 2026 रोजी तामील करण्यात आला असून तुषार मेहरा यास नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित