1982 ते 2026 अजित पवारांचा धडाकेबाज राजकीय प्रवास अन् दुर्दैवी अखेर

1982 ते 2026 अजित पवारांचा धडाकेबाज राजकीय प्रवास अन् दुर्दैवी अखेर
1982 ते 2026 अजित पवारांचा धडाकेबाज राजकीय प्रवास अन् दुर्दैवी अखेर

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २ :- महाराष्ट्राच्या राजकारणात धाडसी निर्णय, स्पष्ट भूमिका आणि प्रशासनावर पकड यासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा राजकीय प्रवास अनेक वळणांचा, संघर्षांचा आणि सत्तेच्या शिखराचा साक्षीदार राहिला. २२ जुलै १९५९ रोजी तत्कालीन अहमदनगर (आताचे अहिल्यानगर) जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे जन्मलेल्या अजित पवारांनी १९८२ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

१९८५ मध्ये राजकीय नेते पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा यांच्याशी विवाह झाल्यानंतर सामाजिक-राजकीय क्षेत्रात त्यांची ओळख अधिक दृढ झाली. १९९१ हे वर्ष त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरले. याच वर्षी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. तसेच १७ जून ते १८ सप्टेंबर १९९१ या कालावधीत बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांनी काम पाहिले. मात्र शरद पवार यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.

यानंतर १९९१ मध्येच ते विधानसभा सदस्य झाले आणि कृषी, फलोत्पादन व ऊर्जा खात्यांचे राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात प्रवेश केला. १९९२ मध्ये जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आली. १९९९ मध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे आणि फलोत्पादन खात्यांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले.

२०१० मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत जलसंपदा खात्याचे मंत्रीपद त्यांनी भूषवले. २०१२ मध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री होत वित्त व नियोजन तसेच ऊर्जा खात्यांची जबाबदारी सांभाळली. २०१४ मध्ये सिंचन घोटाळ्याचे आरोप त्यांच्या कारकिर्दीवर छाया टाकणारे ठरले. त्याच वर्षी फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावली.

२०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे घेतलेल्या शपथविधीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. मात्र त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन होताच ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. २०२२ मध्ये मविआ सरकार कोसळल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारली.

२०२३ हे वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी निर्णायक ठरले. पक्षात फूट पडून अनेक आमदार व खासदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला. शिंदे–फडणवीस सरकारला पाठिंबा देत ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. २०२४ च्या राज्य अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर करून त्यांनी सामाजिक धोरणांवर भर दिला. त्याच वर्षी विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जागा जिंकत त्यांनी विक्रमी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपद भूषवले.

मात्र २८ जानेवारी २०२६ मध्ये बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी, निर्णायक आणि ताकदीचा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. 

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अजित पवारांचा अध्याय कायम स्मरणात राहील…