“ट्रॅक्टरवाल्या शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंपावर बाऊंसर; मेहकरमधील प्रकारावर संताप”

“ट्रॅक्टरवाल्या शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंपावर बाऊंसर; मेहकरमधील प्रकारावर संताप”
“ट्रॅक्टरवाल्या शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंपावर बाऊंसर; मेहकरमधील प्रकारावर संताप”

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २४ :- मेहकर येथे एका पेट्रोल पंपावर ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी बाऊंसर तैनात करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमुळे या घटनेची मोठी चर्चा सुरू झाली असून, “शेतकऱ्यांशी गुन्हेगारांसारखी वागणूक का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

स्थानिकांच्या मते, इंधन भरण्यासाठी आलेल्या ट्रॅक्टर चालकांना अनेकदा तासन्तास रांगेत थांबावे लागत आहे. त्यातच पंपावर बाऊंसर उभे असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती आणि अपमानाची भावना निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. शेतीसाठी दिवसरात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीने वागवणे योग्य नसल्याचे मत अनेकांनी मांडले आहे.

यापूर्वीही विविध प्रश्नांवर शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र संघटित ताकद कमी असल्याने अशा घटनांविरोधात मोठ्या प्रमाणावर आवाज उठत नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे. इतर क्षेत्रातील कर्मचारी किंवा संघटनांवर अन्याय झाल्यास तत्काळ आंदोलन उभे राहते, मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत तशी एकजूट दिसून येत नसल्याची चर्चा आहे.

विशेषतः नव्या पिढीतील तरुण शेतकऱ्यांनी अन्यायाविरोधात सोशल मीडियासह विविध माध्यमांतून आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचा सन्मान आणि हक्क टिकवण्यासाठी संघटित भूमिका महत्त्वाची असल्याचे जाणकार सांगत आहेत.

दरम्यान, ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांना दीर्घकाळ रांगेत उभे ठेवणे आणि पंपावर बाऊंसर तैनात करण्याच्या प्रकाराचा अनेक स्तरांतून निषेध होत आहे.

“अन्नदात्याचा सन्मान राखला गेला तरच शेती आणि समाज दोन्ही मजबूत राहतील.”