लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 66 लाख महिलांचे 1500 रुपये बंद

लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 66 लाख महिलांचे 1500 रुपये बंद

महाराष्ट्र वाणी

मुंबई दि ११ :- राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. योजनेच्या अंतिम पडताळणीनंतर लाखो महिलांना आता दरमहा मिळणारा 1500 रुपयांचा लाभ बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक लाभार्थींना मोठा धक्का बसला आहे.

महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. मात्र, काही अपात्र महिलांनीही योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर सरकारने लाभार्थ्यांची सखोल पडताळणी सुरू केली होती. एप्रिल अखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

या तपासणीत तब्बल 66 लाख महिला अपात्र ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या महिलांना पुढील हप्ते मिळणार नसल्याचे निश्चित झाले आहे. पडताळणीनंतर राज्यात सुमारे 1 कोटी 77 लाख महिला पात्र लाभार्थी म्हणून कायम राहिल्या आहेत.

सरकारच्या माहितीनुसार, अपात्र लाभार्थ्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे लाभ घेतलेल्या महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, अचानक लाभ बंद होणार असल्याने अनेक महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे राज्य सरकारच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. याआधी या योजनेसाठी दरमहा सुमारे 3 हजार 600 कोटी रुपयांचा खर्च होत होता. आता अपात्र लाभार्थी वगळल्यानंतर हा खर्च कमी होऊन सुमारे 2 हजार 655 कोटी रुपयांपर्यंत येणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सरकारला वर्षभरात मोठी आर्थिक बचत होण्याची शक्यता आहे.

“लाडक्या बहिणींना दिलासा की धक्का? राज्यभरात आता या निर्णयाचीच चर्चा सुरू झाली आहे.”