खतासाठी हेलपाटे, शेतकरी त्रस्त; काँग्रेसचे १५ जूनला भव्य रस्ता रोको आंदोलन

खतासाठी हेलपाटे, शेतकरी त्रस्त; काँग्रेसचे १५ जूनला भव्य रस्ता रोको आंदोलन
खतासाठी हेलपाटे, शेतकरी त्रस्त; काँग्रेसचे १५ जूनला भव्य रस्ता रोको आंदोलन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १४ :- राज्य शासनाने रासायनिक खतांच्या विक्रीसाठी सुरू केलेल्या नव्या मोबाईल-आधारित प्रणालीमुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार, १५ जून रोजी चिकलठाणा येथील केंब्रिज चौकात भव्य रस्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, तांत्रिक अडचणी, सर्व्हर वारंवार बंद पडणे, बुकिंग प्रक्रियेत होणारा विलंब आणि वेळेवर खते उपलब्ध न होणे यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर खतांसाठी शेतकऱ्यांना वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने त्यांच्या संतापात वाढ होत आहे.

शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या आंदोलनात जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे, काँग्रेस सेवादलचे प्रदेशाध्यक्ष विलास बापू औताडे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर तसेच शहराध्यक्ष सय्यद अक्रम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि खत वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. आंदोलनात शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

वाचा, विचार करा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील प्रत्येक घडामोडीसाठी ‘महाराष्ट्र वाणी’सोबत जोडलेले रहा.